Saturday, June 3, 2023

संचारबंदीच्या काळात विकले तब्बल २० टन अंजीर; अभियंता तरुणाने केली १३ लाखांची कमाई

पुणे । संचारबंदीच्या काळात इतरांसोबत शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकाची विक्री झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने मात केली आहे. बी ई मेकॅनिकल पदवीधर असणाऱ्या समीरने अंजिर शेतीत प्रयोग केला आहे. यात त्याला यशही मिळाले आहे. त्याने २० टन अंजिराची विक्री करत सुमारे १३ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.

समीरने काही माल पॅकिंग केला व पुण्याच्या सोसायटीमध्ये विकला, तर काही माल हा मॉलमध्ये (जे मॉल अत्यावश्यक सेवा देत सुरु होते, व तेथे फळ भाज्यांचे मार्केट सुरु होते) माल पॅकिंग करुन विकला. यासोबत आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी गावातील ३५ ते ४० शेतकऱ्यांना अंजिराची बाजारपेठही उपलब्ध करून दिली आहे. विक्री न झालेल्या अंजीरावर प्रक्रिया करून त्यापासून जाम बनविण्याची कंपनी त्यांनी सुरु केली आहे. त्यातून त्यांनी अडीच ते तीन टन अंजिरापासून जाम बनविला आहे. पुण्याजवळील दौंड तालुक्यातील खोर या छोट्या गावातील समीर डोंबे या युवकाचा इंजिनीअर ते कृषी क्षेत्रातील उद्योजक असा कौतुकास्पद प्रवास आहे. समीर डोंबे यांनी आपल्या वडिलोपार्जित घेतल्या जाणाऱ्या ‘अंजीर’ शेतीच्या उत्पादनात आधुनिकतेची कास धरत नाविन्यपूर्ण बदल केले आणि अंजीराचा स्वतःचा ‘पवित्रक’ हा ब्रॅन्ड निर्माण केला. आता याचं बदलाच्या जोरावर अंजीराच्या बाजारपेठेत समीर यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

खोर हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील डोंगराळ प्रदेशातील गाव आहे मात्र पाण्याची इथे पाण्याची कमतरता आहे. कमी पाण्यावर अंजीराचे उत्पादन घेणे तसे कठीणच. पाण्याचे नियोजन करून शेतकरी गावात सुमारे 250 एकरावर अंजिर घेतात. इंजिनिअरिंग करून शेतीकडे वळत त्याने एक चांगला आदर्श सर्वांसमोर घातला आहे. शासनाच्या आर्थिक मदतीने 40 दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून ‘डोंबे पाटील’ नावाने अंजीर प्रोसेसिंग युनिट सुरू केले. त्याद्वारे अंजीर जाम आणि अंजीर जेली हे उत्पादन बनविले. समीर डोंबे यांच्या या प्रयत्नांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.