हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कार्डेलिया क्रूझवर पार्टीवर छापा टाकल्यानंतर आता अडचणीत आलेल्या समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रभाकर साईल यांच्यानंतर आता अन्य एका प्रकरणातील पंच शेखर कांबळे हा समोर आला असून वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचे सांगितले आहे. त्यावेळी 10 कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेतल्या होत्या. ती कारवाई बोगस होती, असा आरोप त्यांनी केलाय.
शेखर कांबळे असं या पंचाचं नाव असून तो नवी मुंबईत राहतो. खारघर येथील एका प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पंच बनवलेलं आहे. नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कारवाईचं हे प्रकरण आहे. या प्रकरणात ज्या दोघांना पकडण्यात आलं होतं, त्यांच्याकडं कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. असं असतानाही त्यांच्याकडं ६० ग्रॅम ड्रग्ज सापडल्याचं नमूद करण्यात आलं, असं कांबळे यांनी सांगितलं.
मला काल अनिल माने यांचा रात्री फोन आला. पण मी तिथे गेलो नाही, मला आता भीती वाटतेय. कोर्टात केस जाईल तेव्हा न्यायाधीश जे विचारतील तेव्हा मी काय उत्तर देणार? कारण मी पंचनामा वाचलेला नाही. म्हणून मी आता समोर आलोय. समीर वानखेडे मला 19 तारखेपर्यंत फोन करायचे, खूप वेळा फोन करायचे. मी नायजेरीयन नागरिकांची माहिती द्यायचो. पण त्यांनी मला अंधारात ठेवलं. मी पुढील सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असंही शेखर कांबळे याने सांगितलं.




