हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूर ते मुंबई दरम्यान असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सतत होणाऱ्या अपघातांच्या बातम्यांनी नेहमीच चर्चेत असतो. मागील 9 महिन्यात समृद्धी महामार्गावरून तब्बल 49 लाख वाहनांनी प्रवास केला असून यादरम्यान, 850 पेक्षा अधिक अपघातांच्या घटनाही घडल्या असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सातत्याने घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी MSRDC व राज्य परिवहन विभाग सतत प्रयत्नशील आहे. आताही सरकारकडून समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आले आहे.
महामार्गावर दर 5 किमीवर रंबल पट्ट्या बसवणार : Samruddhi Mahamarg
समृद्धी महामार्गावर होणारे अपघात मुख्यत्वे करून टायर खराब असणे व महामार्ग संमोहन यामुळे होत आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गावर दर 5 किलोमीटरवर रंबल पट्ट्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, पट्ट्या सुमारे 10 किमी अंतरावर आहेत. याशिवाय वाहनचालकांना सतर्क राहण्यासाठी कॅरेज वेवर शिल्पे उभारली जातील. त्याचबरोबर महामार्गांवर परावर्तित टेप, सोलर ब्लिंकर जागोजागी बसवण्यात येणार आहेत. यामुळे महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता निश्चित केली जाईल.
वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवणार :
नागपूर- मुंबई द्रुतगती महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघात कमी करण्यासाठी MSRDC च्या अधिकाऱ्यांनी विविध सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. ” आम्ही नियमित अंतराने वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्याची योजना आखत आहोत, MSRDC ने सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी टोल प्लाझावर सावधगिरीचे संकेत, सार्वजनिक घोषणा प्रणाली देखील समाविष्ट केल्या आहेत. ” असेही अधिकाऱ्याने यावेळी नमूद केलं.
3 दिवस साडेतीन तास राहणार महामार्ग बंद :
समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक मंगळवार, बुधवार व गुरुवारी दुपारी १२ महामार्ग ते साडेतीन या वेळेत बंद असेल. उर्वरित वेळेत वाहतूक सुरळीत सुरू राहील.