हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अभिनेत्री मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटातील पहिलं धमाकेदार गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘सनई संग’ असे बोल असणारं हे गाणं लग्नसमारंभात प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. मयुरी आणि भूषणवर चित्रित झालेले हे गीत अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून या गाण्याला स्वप्नील गोडबोले, प्रफुल कार्लेकर यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे, तर ह्याचे नृत्य दिग्दर्शन डान्स इंडिया डान्स फेम प्रिन्स यांनी केले आहे.
मेहंदी समारंभातील हे गाणं अतिशय कलरफुल असून यात लग्नाचा माहोल, सनई चौघडे, पाहुण्यांची लगबग, तरुणाईचा उत्साह, मजा मस्ती धमाल दिसत आहे. कपड्यांची रंगसंगती, नृत्य दिग्दर्शन या सगळ्याच गोष्टी नजरेला सुखावणाऱ्या आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित ‘लग्नकल्लोळ’चे मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शक आहेत. तर आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले असून १ मार्च रोजी हे सनई चौघडे वाजणार आहेत.
या गाण्याबद्दल सह दिग्दर्शक डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ” लग्नसमारंभ असला की जोश, उत्साह हा असतोच. असेच उत्साहाने भरलेले गाणे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. प्रत्येकाला ठेका धरायला लावेल, असे हे गाणे आहे. यात मयुरी आणि भूषण यांच्या नृत्यात भन्नाट एनर्जी दिसत आहे. त्यात म्युझिक टीमही अतिशय कमाल असल्याने या गाण्यात अधिकच रंगत आली आहे. प्रत्येक लग्नसमारंभात वाजेल असे हे गीत आहे’.
तसेच या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहम्मद बर्मावाला म्हणाले कि, ‘चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आधीच आली आहे. लग्न म्हटले की घरात कल्लोळ हा आलाच. परंतु हा कल्लोळ जरा वेगळा आहे. यात खूप रंजक ट्विस्ट आहे. हा कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाचा खजिना ठरेल अशी माझी खात्री आहे’.