हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दररोज कुठे ना कुठे अपघाताची बातमी समोर येत आहे. आज सांगली जिल्ह्यातील चिंचणी येथे अल्टो कार कालव्यात कोसळून (Sangli Alto Accident) मोठा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर एक महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास सदर ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. कॅनॉल मध्ये पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे भरधाव वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. गाडीचे स्पीड इतकं फास्ट होत कि, कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला आणि कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे. मध्यरात्री अपघात झाल्यामुळे त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. त्यामुळे या कुटुंबाला मदत सुद्धा मिळाली नाही. या घटनेमुळे परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60, सुजाता राजेंद्र पाटील -वय 55, प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव), ध्रुवा- वय 3 वर्ष , कार्तिकी- वय 1 वर्ष, राजवी- वय 2 वर्ष, जखमी स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष असे सदर अपघात ग्रस्तांची नावे आहेत. हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते. वाढदिवस आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास परत माघारी जाताना हा अपघात झाला. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत.