सांगली प्रतिनिधी | जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी उपाययोजना अद्याप कागदावर आहेत. दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा घेण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ सदस्य डी के काका पाटील, अर्जुन पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह सदस्यांनी केली. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन लवकरच सांगली जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार आणि जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात येईल, असे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जाहीर केले.
सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम वाया गेला. त्याच्यासोबत जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे टँकरची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर टंचाईच्या उपाययोजना होण्याची आवश्यकता होती. मात्र दुष्काळी परिस्थितीत कोणताही सरकारी कागद कोणत्याही अधिकाऱ्याकडे आलेला नाही. तासगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर द्राक्षबागांचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सदस्य चंद्रकांतबापू पाटील यांनी केली. द्राक्षबागांना टँकर द्या, अन्यथा अत्यल्प भूधारक बागायतदार संपून जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
विटा येथील जय मातादी मंगल कार्यालयातील संपतराव माने सभागृहा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सभेचे संयोजक तथा उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती डॉक्टर सुषमा नायकवडी, अरुण राजमाने, तमनगौंडा पाटील, ब्रह्मानंद पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी विक्रांत बगाडे, अधिकारी निलेश घुले यांच्यासह सदस्य उपस्थित होते.