सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने संपूर्ण लॉकडाउनच निर्णय घेतला असल्याचे समजत आहे. यानुसार जिल्ह्यात आता ३० जुलै पर्यंत कडक संचारबंदी जारी करण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात २२ जुलै बुधवारी रात्री पासून ते ३० जुलै रात्री दहा पर्यंत म्हणजे सात दिवसांचा लॉकडाउन होणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात इथे अपडेट होईल
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी चार जणांचा मृत्यू झाला त्यामुळे बळींची संख्या 33 वर पोहोचली. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा एक हजाराचा आकडाही पूर्ण झाला. मिरज येथील 65 वर्षीय वृद्ध आणि 48 वर्षीय पुरुष, सांगलीतील 70 वर्षीय वृद्ध आणि मिरज तालुक्यातील बेळंकीतील 34 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यात नव्याने 64 रुग्णांची नोंद झाली. महानगरपालिका क्षेत्रात 40 रुग्ण आढळले असून सांगलीत 25 तर मिरजेतील 15 रुग्णांचा समावेश आहे. खानापूर तालुक्यात सात, मिरज तालुक्यातील सहा, कवठेमहांकाळ, तासगाव आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी दोन, शिराळ्यात तीन, कडेगाव व आटपाडी तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.
दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1013 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 33 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 435 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 545 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.