सांगली प्रतिनिधी | कृष्णा नदीने पूराचा कहर मांडला असतानाच याचा फटका सांगलीच्या जिल्हा कारागृहाला ही बसला आहे. कारागृहात गुन्ह्यांची शिक्षा भोगत असणारे ३९० कैदी पर्यायी ठिकाणी हलवण्यात आले आहेत. या स्थलांतराच्या दरम्यान दोन कैद्यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन पळ काढला आहे. हे दोन कैदी तरुंगातून फरार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
तुरुंगात पाण्याची पातळी वाढत गेल्याने तुरुंगाधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्याला पत्र लिहून एनडीआरएफचे एक पथक पाठवण्याची विनंती केली. तुरुंगाधिकाऱ्यांच्या विनंती वरून जिल्हाधिकाऱ्यांनी एनडीआरएफचे एक पथक कैद्यांच्या स्थलांतरासाठी पाठवून दिले. त्या कैद्यांचे स्थलांतर पटवर्धन हायस्कुल मध्ये केले जात असताना हे दोन कैदी पसार झाले आहेत.
दरम्यान दोन पैकी एका कैद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसऱ्या कैद्याला पकडण्यास पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली आहे. पावसाने कहर मांडला असतानाच कैद्याने असा पळ काढल्याने या प्रकारची संपूर्ण सांगलीत चर्चा रंगात आली आहे.