सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सत्ताधारी व विजयाची सर्वाधिक संधी म्हणून भाजपकडे इच्छुकांचा मोठा प्रवाह येत असून सांगली व जत मतदार संघात बलाढ्य इच्छुकांनी आपल्या मुलाखती दिल्यामुळे या ठिकाणी जोरदार चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी बंडखोरी होण्याचे संकेत आतापासूनच प्राप्त होऊ लागले आहेत.
आ.विलासराव जगताप यांच्या विरोधात सभापती तम्मनगौडा रवी, डॉ.रविंद्र आरळी यांनी आव्हान उभे केले असून सांगलीमध्ये आ.सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात माजी आ.दिनकर पाटील, जि.प. सदस्य पप्पू डोंगरे, प्रदेश उपाध्यक्ष निता केळकर यांनी आव्हान उभे केले आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी प्रत्येक उमेदवाराशी ‘वन टू वन’ चर्चा करुन मुलाखत घेतली. दरम्यान शिराळा विधानसभा मतदार संघात आ.शिवाजीराव नाईक यांच्यासमोर सम्राट महाडिक यांनी आपले आव्हान उभे केले आहे तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासमोर खा.संजयकाका पाटील यांच्या पत्नी सौ.ज्योतिताई यांनी उमेदवारी मागितली आहे.
विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. जिल्ह्यातील सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, शिराळा, इस्लामपूर या आठ विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज पक्षाकडून मागविण्यात आले आहेत. इच्छुकांच्या मुलाखती देखील मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी घेतल्या आहेत