हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली चर्चेत आली ती विशाल पाटील या नावामुळं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादांचा हा नातू. जवळपास तीन दशकं सांगलीच्या जागेवर या दादा पाटील घराण्याचं एकहाती वर्चस्व होतं. वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, मदन पाटील, प्रकाशदादा पाटील आणि प्रतिक पाटील अशा दादा घराण्याने १९८० पासून ते २०१४ पर्यंत सांगली आपल्या ताब्यात ठेवली. त्यामुळं सांगली म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पाटील घराणं.. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. पण याच घरातील राजकारणात येऊ पाहणाऱ्या विशाल पाटलांना मात्र तिकीट मिळवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतोय. शिवसेनेची ताकद नसतानाही ही जागा उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे घेत इथून राजकारणातल्या नव्या नवख्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवलं. नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजित कदमांच्या मदतीनं दिल्ली हायकमांडपर्यंत पायऱ्या झिजवल्या. पण आपल्याला ठरवून साईडलाईन करण्यात आल्याचं पाटलांच्या लक्षात आलं म्हणूनच त्यांनी आता पलटी मारलेल्या सगळ्यांना दादा पाटील घराण्याचा इंगाा दाखवायचा निर्णय घेतलायं. विशाल पाटील सांगलीत बंडाच्या तयारीत असून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असतील आता हे कन्फर्म समजलं जातंय. विशाल पाटील हे नाव येत्या काळात उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले यांंना कसा घाम फोडू शकतं? काँग्रेस आणि शिवसेनेनं पाटलांना डावलून स्वत:;च्या पायावर कसा धोंडा पाडून घेतलाय? सांगलीतून विशाल पाटील निवडून येण्याचे खरंच चान्सेस किती आहेत? हेच जाणून घेऊयात ..
महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा काँग्रेसला सुटणार आणि विशाल पाटील उमेदवार असणार, हे गणित फिक्स होतं. नाना पटोले, पृथ्विराज चव्हाणांनीही या चर्चांना आधीच ग्रीन सिग्नल दिला होता. वंचित फॅक्टर आडवा आला, स्वाभिमानीच्या तिकीटावर लढावं लागलं, नाहीतर २०१९ मध्येच पाटलांचा नातू खासदार झाला असता. हीच चूक पुन्हा करायची नाही त्यामुळे विशाल पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते डोळयात तेल घालून नेमकं काय घडतंय, हे पाहत बसले होते. पण कोल्हापुरच्या जागेवरुन या सगळ्यात मीठाचा खडा पडला. कोल्हापुरची जागा ठाकरे गटाला सुटणं अपेक्षित असताना शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं ठाकरेंंनी ही जागा काँग्रेसला सोडली आणि कोल्हापुरच्या बदल्यात सांगली. असा नवा फॉर्म्युला समोर आला. काहीही झालंं तरी, काँग्रेसचे नेते आपला हा पारंपारिक बालेकिल्ला हातचा जाऊ देणार नाही, याचा विश्वास विश्वजित कदम आणि विशाल पाटलांना होता. पण सांगलीच्या खासदाारकीसाठी कसून तयारी करणाऱ्या चंद्रहार पाटलांचा शिवसेनेेनं पक्षप्रवेश करुन घेतला आणि इथंच वादाला सुरुवात झाली. अजून मविआच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु होत्या. सांगलीची जागा कुणाला जाणार यावर खल सुरु होता. यादरम्यानच शिवसेनेनं सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करत काँग्रेसची कोंंडी केली. या निर्णयानं विशाल पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र पक्षातील जागावाटपाच्या प्रक्रीयेत सहभागी असणारे वरिष्ठ ही जागा काही केल्या आपल्यााकडेच खेचून आणतील, याचा त्यांना विश्वास होता. पण ठाकरे आणि राऊत ज्याप्रकारे सांगलीच्या जागेसाठी भांडत होते. त्यातुलनेत काँँग्रेसचे नेते या मागणीसाठी कमी पडले. शेवटी, विशाल पाटील एकटे पडले, मात्र त्यांना विश्वजित कदमांचीच भक्कम साथ मिळाली. पुढे राऊत आणि विशाल पाटील यांच्यात अनेक शाब्दिक चकमकी झाल्या. हमरीतुमरीची भाषा झाली. कदमांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे दिल्लीच्या वाऱ्या केल्या. प्रेशर पॉलिटीक्सचा पुरता वापर करुनही जेव्हा मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला. तेव्हा सांगली आपल्या हातातून निसटून गेलीय. हे त्यांना कळून चुकलं. आघाडीच्या चर्चांमध्ये काय ठरलं, विशाल पाटील विनिंग कँडिडेट असतानाही ठाकरेंना ही जागा का सोडली, या सगळयाला अनेक कारण असली तरी यांची बॉटमलाईन फिक्स होती, ती म्हणजे सांगलीत विशाल पाटलांचा गेम झाला होता.
२०१९ मध्ये ही जागा आघाडीतील स्वाभिमानीला सुटल्याने विशाल पाटलांनी नाईलाजाने का होईना पण काँग्रेसचा झेंंडा खाली ठेवत स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. अगदी कमी वेळ मिळूनही वंचितच्या गोपिचंद पडळकरांच्या व्होट शेअरिंंगमुळे दादा पाटलांचा हा नातू निवडणूक हारला. विशाल पाटलांवर झालेला हा अन्याय भरून काढण्याची संधी काँग्रेसकडेे होती. तीही त्यांनी जाणिवपूर्वक म्हणायची की अनावधानानं पण हातची गमावली. प्रतिक पाटलांनी सक्रीय राजकारणातून माघार घेतल्यामुळे दादा पाटील घराण्याचा सांगलीच्या राजकारणातील वावर कमी झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील आपलं राजकीय अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर विशाल पाटलांसाठी ही लोकसभा निवडणूक निर्णायक आहे, हे तर फिक्स आहेे. म्हणूनच आता त्यांच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे अपक्ष का होईना पण लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा…
विशाल पाटलांनी २०१९ मध्ये जी चूक केली ती पुन्हा करु नये, असा सल्ला संजय राऊतांनी दिला खरा. पण पाटील आता अपक्ष निवडणूक लढवणार हे कन्फर्म समजलं जातंय. विशाल पाटलांच्या स्विय सहाय्यकाने लोकसभेचे दोन उमेेदवारी अर्ज दाखल केले असून पाटील सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असं सध्याचं करंट स्टेटस सांगता येईल. विशाल पाटलांचे मोठे बंधू प्रतिक पाटील यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. तेव्हा ते वंंचितच्या तिकीटावर सांगलीतून उतरतील, असं बोललं गेलं. पण विशाल पाटील यांच्यासमोरची आव्हानं पाहता ते सध्या कुठल्या पक्षाच्या टॅगखाली निवडणुकीत न उतरता अपक्ष लढण्याचेच चान्सेस जास्त आहेत. कारण सांगली काही केल्या जिंकणं त्यांना महत्वाचं आहे, पण याहीपेक्षा आपला मतदारसंघातला दबदबा दाखवून द्यायचा असेल, तर स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता ही पर्याय नाहीये. मात्र विशाल पाटील यांचा हा निर्णय सांगली काँग्रेसमध्ये मोठा स्फोट घडवणारा असेल.
दादा पाटील घराण्याला मानणाऱ्या पारंपारिक काँग्रेसी कार्यकर्त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड आहे. विशाल पाटलांचं बंड म्हणजे पाटलांना मानणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं बंड असल्यानं जिल्ह्यात काँग्रेस बॅकफूटला फेकली जाईल. एकदा का त्यांनी हा निर्णय घेतला तर ते पुन्हा काँग्रेसकडे परतण्याची शक्यता धूसर दिसते. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसचंं ग्राऊंड नेटवर्क, कार्यकर्त्यांची फळी ही ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांसाठी काम न करता विशाल पाटलांसाठी काम करेल. विश्वजित कदमांसारखा जिल्ह्यातील सपोर्टही त्यांच्या बाजूने असल्याने काँग्रेसमध्येच राहून ते विशाल पाटलांना रसद पुरवतील. त्यामुळे कारण नसताना प्रतिष्ठेच्या केलेल्या सांगलीच्या जागेवर ठाकरे तोंडावर आपटण्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जोरावर आपण इथून आरामात निवडून येऊ, असा आत्मविश्वास असल्यानेच ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसारख्या नवख्या चेहऱ्याला उमेदवारी देऊ केली. पण ज्या सांगलीत काँग्रेसचं मोठं वजन राहीलय. दादा पाटील घराण्याचा दाब राहीलाय. त्यांनाच शिंगावर घेऊन हा डाव टाकणं, त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे. विशाल पाटलांचा राग रास्त असताना संजय राऊत यांचे शाब्दिक प्रहार अर्थातच त्यांच्या मनाला लागले असावेत. काँग्रेसचा तो अंतर्गत मॅटर आहे, असं याकडे न पाहता राऊतांनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा राग चांगलाच वाढलाय.
विशाल पाटील अपक्ष मैदानात उतरतायत म्हणजे त्यांच्याकडे जिंकून येण्याचा काँन्फिडन्स आहे. काँग्रेसची फळी प्लस, पाटलांचे कार्यकर्ते प्लस, विश्वजित कदमांची रसद असा आकडा जुळवून पाहिला तर विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्लसमध्येच दिसते. सांगली घेण्याचा हट्ट करणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासाठी म्हणूनच विशाल पाटील हे सध्या काळ बनून उभे आहेत. दुसरीकडे नाना पटोले यांनी सांगलीचा जागा मिळण्यासाठी दाखवलेल्या निष्क्रीयतेचा अर्थ म्हणजे राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांना विशाल पाटलांच्या राजकारणात येण्याला विरोध असल्याचीही चर्चा आहे. असं असेल तर विशाल पाटील अपक्ष उभे राहून काँग्रेससाठीही मेसेज देण्याच्या तयारीत आहेत..
सध्याची स्थिती पाहिली तर विद्यमान खासदार संजय काका पाटील, शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यासोबतच वंचित, स्वाभिमानी शेतकरी पक्षही सांगलीत नशिब आजमवतायत. आता त्यात विशाल पाटलांनीही वसंतदादा आघाडीच्या नावाने लोकसभेचा शड्डू ठोकल्याने सांगलीचा तीढा आणखीनच गुंतागुंतीचा बनलाय. पण विशाल पाटील या नावाने पुढील काही दिवस संजय राऊत, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या छातीची धडधड वाढलेली असेल. एवढं मात्र निश्चित…साांगलीचं मैदान मारण्याईतपत खरंच विशाल पाटलांची ताकद आहे का? तुमचं ऐनालिसीस काय सांगतं? आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा…