दारूच्या नशेमुळे बाप लेकामध्ये झाला वाद ! मुलाकडून जन्मदात्याची निर्घृणपणे हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमध्ये बाप – लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सोनलगी या ठिकाणी आरोपी मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. पोटच्या मुलानेच जन्मदात्याचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी पहाटे हि घटना घडली आहे. शिवाप्पा चंद्राम पुजारी असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे तर मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी असे आरोपी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मल्लिकार्जुन शिवाप्पा पुजारी याला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शिवाप्पा पुजारी यांना दारु पिण्याचे व्यसन होते. बुधवारी रात्री शिवाप्पा पुजारी हे दारु पिऊन आले असताना मुलगा मल्लिकार्जुन आणि वडील शिवाप्पा यांच्यात वाद झाला. यावेळी या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी काही जणांनी मध्यस्थी करण्याचेही प्रयत्न केले. मात्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याने ते कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रात्रभर या दोघांमध्ये वाद सुरु होता.

मुलाची वडिलांना धक्काबुक्की
हा वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याने मुलगा मल्लिकार्जुन यांनी वडिलांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये वडील शिवाप्पा घराच्या बाजूला असलेल्या पत्र्यावर पडले आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.