हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील रेल्वे स्थानकातील (Railway Station) स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वेने ” मेरा स्टेशन मेरा अभिमान 2023 ” हे विशेष अभियान राबविले. या मोहिमेत मध्य रेल्वे मधील बहुतांश स्थानकांचा सहभाग होता. मात्र या अभियाना अंतर्गत रेल्वे स्थानकांना देण्यात आलेल्या श्रेणित मोठ्या स्थानक गटामध्ये सांगली रेल्वे स्टेशन (Sangli Railways Station) नंबर वन ठरलं आहे. त्यामुळे सांगलीकरांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.
स्वच्छतेसंदर्भात स्थानकात प्रबोधन
सांगली रेल्वे स्थानकला स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थानी आणण्यासाठी सांगली रेल्वे स्थानकाचे स्थानक व्यवस्थापक विवेककुमार पोदार यांनी स्थानकातील 100 हुन अधिक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन विविध योजना आखल्या होत्या तसेच विशेष अभियान देखील राबविले. सांगली रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे स्थानकातील स्वच्छते संदर्भात विशेष प्रभोधन देखील करण्यात आले. त्याचेच फळ म्हणजे स्थानकात स्वच्छता कायम ठेवण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश आलं आहे.
13 लाखपेक्षा अधिक प्रवासी स्थानकात वावरतात
संपूर्ण वर्षभरात सांगली रेल्वे स्थानकातून 13 लाख पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात .अभियानादरम्यान स्थानकात प्रवाश्यांची एवढी रेलचेल असताना देखील स्थानकातील स्वच्छता कायम ठेवण्यात स्थानक व्यवस्थापकांना यश आले. या सर्व केलेल्या कार्याबद्दल नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी स्थानकातील सर्व कर्मचारी व व्यवस्थापक विवेककुमार पोदार यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
साताऱ्यातील वाठार स्थानकही अव्वल
सांगली स्थानकासोबतच छोट्या स्थानक गटात देखील सातारा जिल्ह्यातील वाठार स्थानकाने पहिला नंबर मिळवला आहे. या छोट्याश्या स्थानकाने देखील अव्वल दर्जाची स्वच्छता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे