कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राजू शेट्टींनी दिला एक दिवसाचा अल्टिमेटम..
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
मागील काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ताठकळत ठेवण्याचा प्रयत्न कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून केला जात आहे. सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी पक्षाला देण्यात आल्याने काही मंडळी आम्हांला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत. स्वाभिमानी आणि वसंतदादा घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मतभेदातून ही जागा गळ्यात घालू नका. त्यामध्ये आम्हांला रस नाही. आधी सांगलीचा वाद मिटवा, अन्यथा स्वतंत्र लढू, असा आजचा (मंगळवारपर्यंत) अल्टिमेटम स्वाभिमानी पक्षाचे नेते तथा खा. राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सोमवारी दिला.
सांगली लोकसभा जागेबाबत पेच निर्माण झाल्याने स्वाभिमानी पक्ष आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, त्यानंतर खा. शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या माध्यमातून राज्यात विविध राजकीय पक्ष एकत्रित येऊन महाआघाडी स्थापन केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा या महाआघाडीच्या सहभागी झालेली आहे. आघाडीत स्वाभिमानीला जागा सोडण्याची चर्चा बरेच दिवस सुरू होती. प्रारंभी आम्ही सहा जागांची मागणी केली होती. पण आम्हाला सहा जागा मिळणार नाहीत, हे माहीत होते. त्यामुळे आम्ही तीन नैसर्गिक जागांची मागणी होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा गेली दहा वर्षे स्वाभिमानीकडेच आहे. महाआघाडीतील दोन मोठ्या पक्षांनी प्रत्येकी एक-एक जागा सोडावी, अशी आमची मागणी होती.
स्वाभिमानीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीच्या गोट्यातून आम्हाला बुलढण्याची एक जागा हवी होती. तिथे रविकांत तुपकर लढणार होते. सांगलीच्या जागेबाबत आमचा आग्रह नव्हता. पण जागा वाटपासंदर्भात निर्णय होत नसल्याने बुलढाण्याबाबत पहिली पसंती राहिली. कॉंग्रेसने जागा देत असताना आम्ही पर्याय ठेवले होते. वर्धा, शिर्डी जर काहीच नाही झालं तर सांगली लोकसभेच्या जागेचा पर्याय ठेवण्यात आला होता. सांगलीबाबत आमचा आग्रह नव्हता. मात्र आज विनाकारण स्वाभिमानीने वसंतदादा घराण्यावर अन्याय केल अशा पद्धतीनं वातावरण निर्माण केलं गेले, हे बरोबर नाही. अजूनही आम्हाला पर्यायी जागा दिली तरी आमची तयारी आहे. काही मंडळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचं काम काही नेत्यांचं सुरू आहे. स्वाभिमानी आणि वसंतदादा घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि ते कायम चांगले राहणार, याबाबत कोणतीही शंका नाही. माजी मंत्री प्रतिक पाटील हे माझ्या छोट्या भावासारखे आहेत. स्वाभिमानीमुळे वसंतदादा घराण्यावर अन्याय होत, असा आरोप केला जात असल्याबद्दलचे आम्हाला खूप वाईट वाटते.
प्रतीक आणि विशाल पाटील यांना ऑफर दिली
माजी मंत्री प्रतीक पाटील यांना स्वाभिमानीकडून लढण्याबाबतची ऑफर मी स्वत: दिली होती, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले. परंतू त्यांनी नकार दिला. त्यानंतर विशाल पाटील यांना विचारले. तेव्हा त्यांनी मला शत्रू खूप आहेत. मी निवडणूक लढवली तर अवघड जाईल, असे सांगत त्यांनीही नकार दिला. वसंतदादा प्रेमींवर अन्याय व्हावा, अशी आमची कोणतीही भावना नाही. बंडखोरीच्या ठिकाणी स्वाभिमानीला लढण्यात रस नाही. आम्ही कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवलं आहे. आम्हाला सांगलीची जागा द्यायची असेल तर वाद संपवून आम्हाला द्यावी, अशी वादग्रस्त जागा आम्हाला नको आहे. आमची फरफट होत असेल तर आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आजपर्यंत (मंगळवार) काही निर्णय घायचा आहे, तो घ्या. तुम्ही बरोबर येणार नसाल तर आम्ही स्वतंत्र लढू, असा इशारा खा. शेट्टी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला दिला.
एक नोट, एक नोटचा सांगलीतही फॉर्म्युला
लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल असं आम्ही होऊ देणार नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने तात्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा आमच्याकडे दोन ते तीन सक्षम उमेदवार तयार आहेत. त्यांची नावे योग्यवेळी जाहीर करु. सांगलीमध्येही एक नोट, एक वोट हा हातकणंगलेतील फॉर्म्युला वापरण्यात येणार असल्याचे खा. शेट्टींनी सांगितले. सांगलीच्या जागेवर स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असलेले माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी लढविण्याबाबत चर्चा करण्यात आली होती, राजकारणाचे शुद्धीकरण करण्यासाठी देशमुख यांच्या उमेदवारीबाबत विचार होता, त्यांच्याकडूनही होकार आला होता. परंतू राजकारणातील बदलती परिस्थिती लक्षात घेवून त्यांनी नकार दिला.
मुख्यमंत्र्यांकडून 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार
निवारा बांधकाम कामगारांच्या साहित्य खरेदीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते खा. राजू शेट्टी यांनी करीत मी चोरांच्या आहारी गेलो नाही, तुम्हीच दरोडेखोरांच्या टोळीत असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. मी काय करतो, हे शेतकऱ्यांना माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=6UFYUc_hiaU&w=560&h=315]