सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
ऑनर किलिंगच्या घटनेनं सांगली जिल्हा हादरला आहे. मिरज तालुक्यातील कवठेपिरान मध्ये बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या सख्या भावानं 22 वर्षीय मित्राचाच भोसकून खून केला. ओंकार माने असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर निखील सुधाकर सुतार हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. शनिवारी रात्री उशिरा कवठेपिरान गावात घडलेल्या ’सैराट’ घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या खून प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी निखिल सुधाकर सुतार, उदय चिलय्या सुतार, सतीश युवराज रणदिवे या तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत ओंकाराचा मित्र मयूर मारुती जल्ली याने ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, संशयित निखिल आणि मयत ओंकार हे दोघे मित्र आहेत. निखिलचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून ओंकार हा चालक म्हणून काम करतो. त्यातूनच निखिल याच्या बहिणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने निखिल सुतार याच्या बहिणीने वर्षभरापूर्वी पळून जाऊन ओंकार याच्याशी प्रेम विवाह केला होता. त्याचा राग निखिलच्या मनात होता. लग्नानंतर नवदाम्पत्य हे गावामध्येच रहात होते. त्यांनी गावात राहू नये असा सुतार कुटुंबीयांचा आग्रह होता. यावरून निखील सुतार आणि ओंकार माने या दोघांमध्ये वादही झाला होता. मात्र, सुतार कुटुंबीयांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ओंकार माने हा पत्नीसह गावात राहण्यासाठी आला होता.
ओंकार हा शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश पाटील यांच्या वाड्याजवळ थांबला होता. त्याचवेळी निखिल हा उदय सुतार आणि सतीश रणदिवे यांच्यासोबत मोटारसायकलवरून आला. यावेळी निखिल आणि ओंकार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी वाद विकोपाला गेल्याने निखिल याने कमरेला असलेल्या धारदार शस्त्राने ओंकारवर हल्ला करत भोसकले. पोटामध्ये वर्मी घाव बसल्याने अतिरक्तस्राव झाला. ओंकारने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील युवक धावत आले असता रक्ताच्या थारोळ्यात ओंकार पडलेला दिसला.
गावातील युवकांनी गाडीमधून त्याला सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. खुनानंतर काही तासातच हल्लेखोर निखील हा शस्त्रासह सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. खुनाची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कुटुंबीयांचा विरोध झुगारून बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पतीचा सख्या भावाने भोसकून खून केल्याच्या ’सैराट’ घटनेनं जिल्हा हादरून गेला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.