संग्राम देशमुखांची निवडणुकीच्या रिंगणातून पुन्हा एकदा माघार, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून दुसऱ्यांदा माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते कमालीचे निराश व संतप्त झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी तयारी करुन रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे सन २०२४ पर्यंत कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याचे आव्हान ते कसे पेलणार? यावरच त्यांचे पुढील राजकारण अवलंबून आहे.

पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पलूस-कडेगाव मतदारसंघ पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम यांना सहानुभूती होती. यामुळे भाजप नेत्यांंमध्ये ही निवडणूक लढविण्याबाबत संभ्रम होता. सन १९९६ साली संपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पतंगराव कदमांनी निवडणूक लढविली असल्यामुळे सन २०१८ ची पोटनिवडणूक लढवावी असा देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यासाठी मेळावा घेत मोठे शक्ती प्रदर्शन पृथ्वीराज व संग्राम देशमुख यांनी केले. नंतर मात्र चंद्रकांतदादांच्या मध्यस्थीने उमेदवारी अर्ज मागे घेऊन विश्वजीत कदम बिनविरोध आमदार झाले. यावेळी कार्यकर्त्यांचे मनोबल खचले होते. मात्र याची सहानुभूती आपल्याला पुढील विधानसभेत मिळेल, असा अंदाज देशमुख बंधूंनी बांधला होता. या निवडणूकीत तशी तयारी झाली. संग्राम देशमुख सलग अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कामाचा फायदा व मुख्यमंत्री फडणवीस यांनी पलूसमध्ये विचारलेला ‘संग्रामला जनादेश देणार का?’ हा प्रश्न यामुळे वातावरण तयार झाले होते.

हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. याची माहिती मुख्यमंत्र्यांबरोबर देशमुख बंधूंनाही होती युती होणार याबाबतही खात्री होती मग माघारच घ्यायची होती तर एवढी प्रचंड तयारी करण्याची गरजच काय होती असा सवाल सन २०१८ प्रमाणे आताही कार्यकर्ते विचारत आहेत. सोशल मिडियातून जबरदस्त स्पर्धा कदम व देशमुख गटात सुरु होती. अनेक पैजाही लागल्या होत्या. शिवसेनेला जागा सुटल्यानंतरही देशमुख बंधूंनी दोन दिवस कार्यकर्त्यांना आशेवर ठेवले. तिकीट बदलले जाईल, असा विश्वास दिला. पण ऐनवेळी माघार घेऊन त्यांच्या समर्थकांची घोर निराशा केली. पृथ्वीराज देशमुख यांची विधानपरिषदेची आमदारकी केवळ वर्षभराची आहे तर संग्राम देशमुख यांचे अध्यक्षपद अजून अवघ्या दोन महिन्यांचे आहे. ही पदे गेल्यानंतर २०२४ पर्यंत कार्यकर्त्यांचे मनोबल टिकविण्याचे मोठे आव्हान देशमुख बंधूंना पार पाडावे लागेल.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment