कराड | शेरे (ता. कराड) येथे ग्रामपंचायत व माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. यामध्ये सुमारे २५० ग्रामस्थ व युवकांनी सहभाग घेतला होता. गावातील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्या – त्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. यातून सुमारे 20 ट्रेलर कचरा गोळा करून बाहेर काढण्यात आला. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी झाले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत व माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानने स्वच्छता अभियान आयोजित केले होते. प्रारंभी श्री विठ्ल मंदिरात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्या – त्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. याकामी सुमारे 250 ग्रामस्थ व कार्यकर्ते सहभागी झाले होते. गोरक्षनाथ मठ ते विश्वास मळा व पवार आळी या भागातही स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छतेचे साहित्य घेवून रस्ते, गटारे व अडगळीच्या जागेतील कचरा व तण साफ करून बाहेर काढण्यात आले. यातून सुमारे 20 ट्रेलर कचरा गोळा झाला. त्याची कुजवन व्यवस्थाही करण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीत पुरामुळे साचलेला गाळ मनुष्यबळाच्या सहाय्याने उचलून तो गावात लावलेल्या वृक्षांना खत म्हणून वापरण्यात आला. ग्रामपंचायत व माऊली प्रतिष्ठानने घेतलेल्या स्वच्छता अभियानास यशस्वी प्रतिसाद मिळाल्याने गाव व परिसर चकाचक झाला. त्यावर महिला व युवतींनी रांगोळ्या रेखाटत गावच्या सौंदर्यास नवा साज दिला.