परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
मागील तीस वर्षा पासुनची विजयाची वाटचाल कायम ठेवत शिवसेनेने परभणीचा गड राखलाय. संजय जाधव सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडूण आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा पराभव केलाय.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शिवसेनेने आघाडी घेतली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकरांनी शिवसेनेला काट्याची लढत दिली. मागील लोकसभा निवडणुकीत एक लाख सत्ताविस हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडूण आलेले जाधव यांची मतपेटी यावेळी मात्र कमालीची कमी झाल्याचे दिसुन आले. वंचीत बहुजन आघाडीचे आलमगिर खान यांनी 1 लाखांपेक्षा जास्त मते घेतल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला याचा मोठा फटका बसलाय. बाराव्या फेरीपर्यंत 10 ते 20 हजारांची आघाडी शिवसेनेला होती. शेवटच्या फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीला आघाडी मिळेल अशी कार्यकर्त्यांची धारणा होती पण प्रत्येक फेरी सोबत शिवसेना विजयाकडे गेली.
यावेळी पाथरी व परभणी विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादीला मतांची आघाडी दिसुन आली तर गंगाखेड, जिंतुर, घनसांवगी, परतुर मधून शिवसेनेला तारले. राष्ट्रवादीचे चार आमदार , स्थानिक स्वराज्य संस्थेत अस्तित्व असुनही दोन वेळा आमदार व एक वेळ खासदार राहिलेले संजय जाधव यांनी राजकारणातील अनुभव पणाला लावून विजय खेचून आणला असला तरि वंचीत बहुजन आघाडीची उमेदवारी त्यांच्या पथ्यावर पडल्याचे स्पष्ठ चित्र दिसुन आलं. विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढलेल्या राजेश विटेकरांसाठी हा पराभव धक्कादायक आहे तर खात्रीशीर निवडूण येणारी लोकसभेची जागा पक्षांर्तगत गटबाजीने तर गेली नाही ना याचे आत्मपरिक्षण राष्ट्रवादी पक्षाला करावे लागणार आहे .