हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Election) अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले. परंतु अनेकांना यश आले तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव आता पचत नसल्यामुळे अनेक नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. यात सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांचा देखील समावेश आहे. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर संजयकाका पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ चर्चेत राहिला होता. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील, भाजपाच्या संजय पाटील, आणि अपक्ष उमेदवारी करणारे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यात चुरस होती. विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि ठाकरे गटाला धक्का देत विजय मिळवला.
यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली, परंतु पुन्हा पराभूत झाले. या पराभवामुळे संजयकाका पाटील अस्वस्थ असून राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण त्यांना रुचत नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी सोडून भाजपात पुनरागमन करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या चर्चांवर संजय पाटील यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.