शिवरायांचा पुतळा तुटला नाही तर तोडला; नव्या दाव्याने खळबळ

sanjay raut on shivaji maharaj statue
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणी सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असून आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. शिवरायांचा पुतळा तुटला नाही तर तोडला आहे असा आरोप राऊतांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथांनी पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं आणि सर्वात आधी पुण्याच्या शनिवार वाड्यावर ब्रिटीशांचा यूनियन जॅक फडकवला त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. हे आम्हाला दुर्दैवाने बोलावं लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यास विरोध करताय. मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला हे तुमचं पाप आहे. तुम्हीच तोडलात. हा पुतळा तुटला नाही तोडलात”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

महाराजांच्या पुतळ्यात कोट्यावधींचा घोटाळा करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना तुम्ही अटक करु शकत नाही. कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसैनिक जेव्हा मालवणला गेले, तेव्हा त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम जे भाजपचे गुंड करत होते. तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे हे तुमचे गुंड आम्हाला महाराजांचा इतिहास शिकवणार का? असा सवाल करत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असं संजय राऊतांनी म्हंटल.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. वेगळा विदर्भ करणं हे तुमच्या मनात आहे की नाही? वेगळा विदर्भ केल्याशिवाय लग्न करणार नाही असं तुम्ही बोलला होता ना? हि घोषणा कोणाची होती. जर तुम्ही शिवरायांचे खरे भक्त असाल तर बेळगाव कारवार बद्दलची तुमची भूमिका स्पष्ट करा. शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे राज्य तुम्ही खतम करायला निघाला आहेत असा आरोप संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.