हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध करतानाच महापुरुषांविषयी लेखन करताना सावधगिरी बाळगावी असा सल्लाही दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनामध्ये झालेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो. पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युग पुरुष आहेत महाराष्ट्रान देशाला दिलेले. त्यांच्या विषयी लेखन करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं. कारण कोट्यवधी लोकांच्या भावना युगपुरुषांशी जोडल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर काही लिखाण केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरु, मोरारजी देसाई यांना माफी मागावी लागली. जेम्स लेनच्या लेखनावरुन राज्यात आणि देशात वादळ उठलं होतं. आपण कितीही तज्ज्ञ असलो तरी सावधानता बाळगली पाहिजे असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.