हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा वादळी ठरला. ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली पण त्याआधी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीबद्दल बोलताना पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं असून अस वाटलं बहिणीच मुंबईला आली अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातुन भावना व्यक्त केल्या.
मुंबईत येऊन त्यांना उद्धव ठाकरे यांना भेटायचे होते. ती भेट मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजारपणामुळे झाली नाही. ममता बॅनर्जी यांनी प. बंगालात जो ‘खेला होबे’ केला, दिल्लीचा अतिरेक रोखण्याचा, तोच खेळ महाराष्ट्रात झाला. सत्ता, पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड दहशतवाद याचा पराभव प. बंगाल आणि महाराष्ट्राने केला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा होता. एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यावर जातात तेव्हा फार स्वागत होत नाही. ममता बॅनर्जी त्यास अपवाद आहेत. प. बंगालातून जणू बहीणच दोन दिवसांसाठी पाहुणचारास आली, असे मुंबईकरांना वाटले, असे राऊत म्हणाले.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी पत्रकारांसमोर नारा दिला, ‘जय बांगला, जय मराठा!’ प. बंगालच्या वाघिणीची ही गर्जना भविष्यातील राजकारणाची नांदी आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरेंकडे मुंबईत एका भूखंडाची मागणी केली आहे. “मुंबईत पश्चिम बंगालमधून लोक उपचारांसाठी येतात. विशेषत: परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात. त्यांची राहण्याची व्यवस्था होत नाही. पश्चिम बंगालला एखादा भूखंड मिळाला, तर तिथे बंगाल भवन उभारता येईल आणि अशा गरजूंची व्यवस्था करता येईल”, अशी मागणी ममता बॅनर्जींनी आदित्य ठाकरेंकडे केल्याचं संजय राऊतांनी लेखात म्हटलं आहे.