हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) याना माझगाव सत्र न्यायालयाने १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवण्यात आले आहे. कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर संजय राऊत आणखी आक्रमक झालेत. फक्त मी हा मुद्दा लोकांसमोर आणला. तर माझ्याकडून मानहानी कशी झाली? माझा काय संबंध असा सवाल करत भारतीय न्यायव्यवस्थेचे संघीकरण झालंय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, मीरा-भाईंदर भागात युवक प्रतिष्ठान संस्थेला काही शौचालय बनवण्याची कामं मिळाली. त्यामध्ये घोटाळा, गडबड झाली असा आरोप मी केला नव्हता, तर हा आरोप सर्वात आधी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी केला होता . प्रवीण पाटील यांनी याबद्दल मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना पत्र लिहीलं होतं. मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सुद्धा अहवाल दिला कि या भागात काहीतरी गडबड आहे. त्यानंतर त्या भागातील आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला पत्र लिहीत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यावेळी मांडली होती. तसेच याप्रकरणावर विधानसभेत सुद्धा चर्चा झाली आणि याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी विधानसभेत एक आदेश पारित करण्यात आला.
फक्त मी हा मुद्दा लोकांसमोर आणला. तर माझ्याकडून मानहानी कशी झाली ?, माझा संबंध कुठे आला?, मी केवळ प्रश्न विचारले. यात मी अब्रुनुकसान कुठे केली? मग पहिले अब्रुनुकसान ही प्रवीण पाटील यांनी केली. दुसरी मीरा-भाईंदर नगरपालिकेने, तिसरी प्रताप सरनाईक यांनी आणि चौथी राज्याच्या विधानसभेत केली. पण मी सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, असे मला दिसल्यावर मी प्रश्न उपस्थित केला. आज मला पंधरा दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांनी मला पंधरा दिवस काय, पंधरा वर्षे शिक्षा ठोठावली असती तरी मी सत्य बोलण्याचे थांबवणार नाही असं म्हणत न्यायव्यवस्थेचे संघीकरण झाले आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला आहे त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 30 दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपिल करून दाद मागण्याची मुभाही कोर्टाकडून देण्यात आली आहे.