हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मंदिरं उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना पत्र लिहिलं होतं. ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात?’ असा सवाल करताना राज्यपालांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.
अमित शहा यांच्या या भूमिकेचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आभार मानले असून अमित शहांच्या भूमिकेचं स्वागतही केलं आहे. संजय राऊत म्हणाले, ‘राज्यपालांच्या पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचं वक्तव्य राजकीय अर्थानं नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात.’
राज्यपालांच्या पत्रात नक्की काय लिहिलं होते
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. ‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती,’ असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?, असाही प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’