बिहारमध्ये भाजपला हरवण्याइतकी ताकद आमच्यात नाही ; संजय राऊतांची कबुली

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस बिहारमध्ये निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीची चर्चाही रंगली आहे.त्यातच भाजपला हरवण्याइतकी ताकद आमच्यात नाही अशी कबुली शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काल ‘वर्षा’वरील भेटीत चर्चा झाल्याचं समजतं. त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. ‘बिहार निवडणुकीबद्दल कोणताही फॉर्म्युला अद्याप तयार झालेला नाही. तिथल्या काही लहान पक्षांना शिवसेनेसोबत काम करायचं आहे. यातले काही पक्ष जिल्हा स्तरावरचे आहेत. पप्पू यादव यांच्या पक्षानं शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,’ असं राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना बिहारमध्ये ४० ते ५० जागा लढवेल. मात्र अजून तरी युतीबद्दल कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी पुढील आठवड्यात पाटण्याला जाणार आहे. तेव्हा तिथल्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं राऊत म्हणाले. भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते आहे का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बिहारमध्ये भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’