हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बेळगाव मध्ये मराठी माणसाचा पराभव झाला आणि तुम्ही पेढे वाटता?? तुम्हांला लाज नाही वाटत ?? असा सवाल करत बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्याबद्दल ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत आणि जे पेढे वाटत आहेत, महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात इतका नालयाकपणा आणि गद्दारी झाली नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
बेळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला असून तब्बल ३५ जागा जिंकून भाजपने विरोधकांचा धुव्वा उडवला. यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटल की, बेळगावचा निकाल अनपेक्षित असून किमान 20 ते 22 जागा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या होत्या. बेळगावच्या निकालामागे कारस्थान आहे का? अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली. कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये या पराभवाबाबत मोठ्या वेदना लोकांच्या मनात आहेत. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. मराठी माणूस हरल्याबद्दल त्यांच्यात अस्वस्थता आहे. तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही, असं ते म्हणाले.