शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही ; संजय राऊतांचा भाजपला टोला

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप नेते शिवसेनेला लक्ष्य करत आहेत. त्याचाच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही. भाजपावाल्यांनी संघाकडून हिंदुत्व शिकावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.  संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी भाजपावर जोरदार घणाघात केला आहे.

“आमचं राजकीय हिंदुत्व नाही. राजकारणासाठी आजवर कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपण हिंदुत्त्वाची भूमिका मांडतं. घंटा बडवल्या, शेंडी-जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. मी अजूनही शिवसैनिक असून, शिवसैनिकाला वय नसतं असंही यावेळी ते म्हणाले.

शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो, एक वर्षापूर्वी आमच्या हिंदुत्वावर भाजपला शंका नव्हती, राजकारणात जे ठरवून येतात ते कधी टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक राहा, विचार बदलल्याने काही साध्य नाही. बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले हे नव्या पिढीला कळावं म्हणून ठाकरे सिनेमा काढला. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो असं संजय राऊत म्हणाले

30 वर्षांपूर्वी हिंदुत्वाचं वारं वाहू लागलं होतं, तेव्हा इराणमध्ये खोमेनी यांचा उदय झाला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. माझं हिंदुत्व आहे ते वेगळं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व फक्त घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही. घंटा वाजवली म्हणजे हिंदुत्व, शेंडी आणि जानवं घातलं म्हणजे हिंदुत्व तर तसं नाही. राजकारणासाठी शिवसेनेनं हिंदुत्वाचा वापर केला, असं मला वाटत नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

संघाकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही हिंदू आहोतच. पण ज्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा आधार दिल्लीतील राज्यकर्ते आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष घेत आहेत. त्यांनी सरसंघचालकांकडूनही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आरएसएस असेल, विश्व हिंदू परिषद असेल प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काही विषय पुढे घेऊन गेले आहेत. आम्ही कधीही अकारण एकमेकांवर टीकाटिपण्णी केली नाही. कारण शेवटी हिंदुत्वाचा विचार पुढे जाणं महत्त्वाचं असल्याचंही संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’