निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य नाही, शिवसेना खोकेवाल्यांनी विकत घेतली; संजय राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची शिवगर्जना यात्रा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात ती आमची नसून जनतेची शिवगर्जना आहे. धनुष्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, हेच राज्यभर फिरल्यावर दिसून येते. जनतेच्या मनात काय चीड निर्माण झाली आहे, ती खोकेवाल्यांनी पाहावी. जे चाळीस चोर ज्या पद्धतीने सेनेशी बेईमानी करून पळून गेले, त्या चोरांनी शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते खोकेवाले जनतेची हिम्मत कशी विकत घेणार? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिवसेना हा जनतेच्या सामर्थ्यातून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला हा पक्ष किंवा ठाकरे कुटुंब संपले, असे वाटते त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, हेच राज्यभर फिरल्यावर दिसून येते.

निवडणूक आयोगाने खालच्या पातळीवर निर्णय दिले तर चालतात का? आणि मी दिल्या त्या शिव्या नाहीत. मी प्रेमाने म्हंटले आहे. मराठीत तशी भाषा वापरली जाते. मी एवढा असभ्य माणूस आहे का? मला मराठी भाषा त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त समजते.

यावेळी निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला. निलेश राणे यांचा मेंदू ढिल्ला आहे. एवढंच काय त्यांचं सगळंच ढिल्ल आहे, असा टोलाही यावेळी निलेश राणे यांच्या टीकेवर राऊतांनी लगावला आहे.