उद्धव ठाकरेंबाबतच्या ट्विटनंतर एकनाथ शिंदेंबाबत संजय शिरसाटांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले की…

Sanjay Sirsat Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत एक ट्वीट केले. ज्यात ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. मात्र काही वेळातच त्यांनी ट्वीट डिलीट देखील केले. याबाबत शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून “काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं. उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच राहणार आहे,” असे सिरसाट यांनी म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या ट्विटनंतर संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी कधीही कुठेही दबावतंत्राचा वापर केला नाही. मला पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे घेतील. शिंदेंनी पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात संधी दिली जाईल, असा शब्द दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्याबाबत काल मी जे ट्विट केले आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठीमागे एक भाषण केले होते. त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावली होती. आजही माझं असं मत आहे जर तुम्ही कुटुंबप्रमुखाची भूमिका बजावत असाल त्यावेळी मग तुम्ही कुटुंबाचे असलेले मत कुठेतरी लक्षात घेतले पाहिजे होते. तुम्ही तुमच्या मतावर नाही तर कुटुंबाच्या मताबद्दल विचार केला पाहिजे होता. कुटुंबाच्या मताला तुम्ही मान दिला पाहिजे, हा त्याच्या मागचा अर्थ होता. मी ट्विट केले याचा अर्थ कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे राहिले असते, आम्ही नेहमीच त्यांना कुटुंब प्रमुख मानत आलो, परंतु त्यांनी आमचे त्या वेळेला ऐकले नाही आणि आजची जी अवस्था झाली त्याबद्दल आम्हालाही खेद वाटतोय, असे शिरसाट यांनी म्हंटले.

नेमकं घडल काय?

आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंसोबत फारकत घेत एकनाथ शिंदेंच्या गटाचा झेंडा खांद्यावर घेतला. मात्र सुरुवातीपासून शिंदे गटात सामील होऊनही शिरसाट यांना नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मंत्रिपद देण्यात आले नाही. अशातच काल रात्री संजय शिरसाट यांनी एक ट्वीट केले. ज्यामध्ये ‘उद्धव ठाकरे’ यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला होता. टि्वट सोबतच विधानसभेतले उद्धव ठाकरे यांचे एक भाषण देखील त्यांनी जोडले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी हे ट्वीट डिलीट केले. मंत्रीपद मिळालं नसल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा देखील सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका आज स्पष्ट केली.