संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
62
uday samant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – भारतीय परंपरा व संस्कृती यांचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्ये व संस्कारांची समाजात निर्मिती करणे, सांप्रदायिक कलांचा अभ्यास करणे अशी अनेक उद्दिष्ट्ये संतपीठ स्थापनेमागची आहेत. ह्या उद्दिष्टांची पुर्ती करण्यासाठी श्री क्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संतपीठातील अभ्यासक्रम लवकारत लवकर सुरु करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात श्री संत एकनाथ महाराज संतपीठाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, मराठवाडा ही संतांचा इतिहास सांगणारी भुमी आहे. अशा या भुमीत नावारुपाला येणारी संतपीठ ही संकल्पना केवळ विषयांच्या पुस्तकी वा बौध्दीक शिक्षणावर भर देणारी नसून हे समाज शास्त्राचे शिक्षापीठ न राहता समाजसेवेचे दिक्षापीठ होणार आहे. अशा या संतपीठामध्ये तात्काळ विद्यादानाचे काम सुरू होणे आवश्यक आहे. या संतपीठाला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

बैठकीच्या सुरूवातीला कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संतपीठा मधील प्रस्तावित नवीन विभाग व अभ्यासक्रमाचे स्वरुप याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, संत साहित्य, तत्वज्ञान आणि संगीत विभागाअंतर्गत एकूण 5 अभ्यासक्रमांची सुरूवात तात्काळ करता येऊ शकते. यामध्ये तुकाराम गाथा परीचय, ज्ञानेश्वरी परिचय, वारकरी किर्तन, हरीदासी किर्तन आणि एकनाथी भागवत परिचय प्रमाण पत्र या अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संतपीठामध्ये तात्काळ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 11 तारखेला पैठण येथील संतपीठाला भेट देऊन तेथील इमारतीची पाहणी करणार असल्याचे मंत्री महोदयांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here