परभणी प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. परभणीत सर्वच उमेदवारांनी मैदानात उतरत रॅली काढत चारही विधानसभा मतदार संघात मोठं शक्तिप्रदर्शन केल. त्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकड आकर्षित करण्यासाठी, उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या. गंगाखेड विधानसभेतील संतोष मुरकुटे या अपक्ष उमेदवाराने तर, आपली निवडणूक निशाणी असलेल्या हेलिकॉप्टर मधूनच, प्रचार करत आजच्या प्रचाराचा समारोप केला.
संतोष मुरकुटे यांनी निवडणुक लढवत असलेल्या गंगाखेड मतदारसंघातील तीन तालुक्यांमध्ये दौरा केला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस, याचे निमित्त साधत मुरकुटे या अपक्ष उमेदवारान आपलं निवडणूक चिन्ह एकाच वेळी मतदारसंघातील ३०० पेक्षा जास्त गावांमध्ये पोहचवायचा प्रयत्न केला. पुणे येथील कंपनीकडून, भाड्याने हेलिकॅप्टर घेऊन, मतदारसंघातील पूर्णा, पालम आणि गंगाखेडच दौरा केला. जिल्हात या हटके प्रचाराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान शेवटच्या दोन दिवसात मोठ्या घडामोडी करण्यासाठी राजकिय डावपेच खेळले जातील अन् लक्ष्मी अस्त्राचा वापर केल्या जाईल असे राजकिय जाणकार सांगत आहेत.