खुशखबर! आज 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम वितरित होणार

onion subsidy to farmers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मध्यंतरी राज्यात कांद्याचे दर उतरल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला होता. तसेच मुसळधार पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. आज याच घोषणेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार, आज ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये हस्तांतरित केले जाऊ शकतात. आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून त्यामध्ये याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत-जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज या अनुदानाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ऑनलाइन पेमेंटच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी एवढा निधी जमा करतील.

दरम्यान, फेब्रुवारी-मार्च महिन्यात कांद्याचे दर खूपच कमी झाले होते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. अशा शेतकऱ्यांसाठीच शिंदे-फडणवीस सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल 350 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्याचबरोबर, कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यासाठी वित्त विभागाने पणन विभागास 465 कोटी 99 लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे. आज पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर ३०० कोटी एवढा निधी ऑनलाइन वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.