कराड | पाटण तालुक्यातील अबदारवाडी येथील सरपंचाला भर चौकात लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली. बँकेतील रांगेत उभे राहण्यावरुन झालेला वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसात याबाबतची फिर्याद सरपंच विजय शिंदे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या वाजण्याच्या सुमारास कराड-पाटण मार्गावरील मल्हारपेठ ग्रामपंचायतीसमोर सूरज दत्तात्रय पानस्कर (वय – 27, रा. नारळवाडी, ता. पाटण) याने आबदारवाडीगावचे सरपंच विजय शिंदे यांना मारहाण केली. विजय शिंदे हे आपल्या दुचाकीवरुन मेडिकलकडे निघाले होते. त्यावेळी सुरज पानस्कर याने चालू गाडीवर लाथ मारून विजय शिंदे यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना लाथा बुक्क्यानी मारहाण केली व छातीवर बसून गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे आबदारवाडी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. गावात काही काळ ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत सरपंच विजय शिंदे यांनी फिर्यादित म्हटले आहे की, पंधरा दिवसापूर्वी बँक ऑफ मल्हारपेठ शाखेत चेक भरण्यासाठी गेलो असता बँकेतील रांगेत अनेक नागरिक उभे होते. त्यावेळी सूरज पानस्कर याच्यासोबत किरकोळ बाचाबाची झाली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी मी कामानिमित्त मल्हारपेठ येथे गेलो असता सूरज याने पाठीमागून येऊन माझ्या गाडीवरती लाथ मारून मला खाली पाडले व मारहाण केली. या प्रकरणी संशयीत आरोपी सूरज पानस्कर याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. उत्तम भापकर करत आहेत.