सातारा- बेळगाव अपहरणाचा थरार : पाच तासात एकाची सुटका, दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा शहरानजीक असणाऱ्या महामार्गावर असलेल्या हॉटेल प्रिती समोरील पान टपरीत पैसे देण्यासाठी गेलेल्या एकाचे शुक्रवारी रात्री 12.30 वाजता अपहरण केल्याची घटना घडली. या प्रकरणाची माहिती मिळताच सातारा एलसीबी टीमच्या पोलिसांनी पाठलाग करून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथून अपहरणकर्त्यांची गाडी पकडून युवकाची सुटका केली. मध्यरात्री हा अपहरणाचा थरार झाला. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

माज यासीन झाडेवाल, यासीन गुलाब झाडेवाल (दोघे रा. चिकोडी जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री निहाल इमाम कोलकर (रा. रविवार पेठ. सातारा) हा युवक तंबाखू व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी गणेश चौक परिसरात गेला होता. यावेळी त्याच्या पाठीमागून आलेल्या स्विफ्ट (क्रमांक एम. एच. ०६ ए.बी ३३२२) मधून आलेल्या चौघांनी कोलकर याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. गाडीत बसवल्यानंतर त्याच्याकडील चार लाख व १ तोळे सोन्याची चैन असा साडेलाखांचा ऐवज काढून रूपये घेतला. अपहरणकर्ते कोलकर घेवून कोल्हापूरच्या दिशेने निघून गेले.

याबाबतची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर रात्रगस्त करणाऱ्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, सपोनि नवनाथ घोगरे व एलसीबीच्या एका पथकाने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. तासवडे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणद्वारे गाडीचा पाठलाग करून बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथे कोलकर याची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर संशयितांना ताब्यात घेवून एक पथक साताऱ्यात दाखल झाले. दरम्यान, अपहरण झालेल्या कोलकर याचे अपहरण केल्याने अटकेत असलेले झाडेवाल हे बेळगाव परिसरातील मोठे तंबाखू व्यापारी आहेत. कोलकर व त्यांच्या व्यवहारातूनच हे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोन्हऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोनि किशोर धुमाळ, नवनाथ घोगरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहाय्यक उपनिरीक्षक उत्तम दबडे, हवालदार अतिश घाडगे, शरद बेबले, मुनीर मुल्ला, प्रवीण फडतरे, विजय कांबळे, संजय शिर्के, रोहित निकम, विशाल पवार यांनी केली.