बीएसएफचे जवान ज्ञानेश्वर जाधव शहीद! जम्मू आणि काश्मिरमध्ये कर्तव्य बाजवतांना आलं वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

बीएसएफमधील जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. जाधव यांचे धकटवाडी (ता.खटाव) हे मूळगाव आहे. त्यांचे पार्थिव उद्या (शनिवार) गावी येणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीतून देण्यात आली आहे.

याबाबतची माहिती वडूज पाेलिस स्थानकातून तसेच येथील पोलीस पाटील नामदेव रामचंद्र माने यांनी दिली. जवान ज्ञानेश्वर हे २०१५ कालावधीत बीएसफमध्ये दाखल झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले आहे. त्यांना सहा महिन्याचा मुलगा आहे. घरची परिस्थिती जेमतेम असून ज्ञानेश्वर यांचे इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांचे शिक्षण सिद्धेश्वर कुरोली (ता.खटाव) येथे झाले.

त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबियांना जम्मू काश्मीर मधून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी कळविले. ज्ञानेश्वर यांचे पार्थिव उद्या (शनिवार) संध्याकाळ पर्यंत गावात पोहचेल असे सरपंच कृष्णाजी रंगू माने यांनी दिली.