Friday, June 2, 2023

साताऱ्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ४२२ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा शनिवारपासून रेड झोन बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करत असून मागील ४ दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत २०० ची भर पडल्याने जिल्हावासी हैराण झाले आहेत. आज कोरोनाबाधितांच्या संख्येत ८० ची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाबधितांचा आकडा ४२२ वर जाऊन पोहचला आहे. साताऱ्यातील ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय पसरले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आहे. कम्युनिटी स्प्रेडचा प्रकार जिल्ह्यात सुरु झाल्याने गावं पूर्णपणे सील करण्यात येत आहेत. कराडमधील शेणोली गावात एकाच घरातील ७ व्यक्ती बाधित आढळल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी सकाळी ५२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याच संख्येत रात्री उशिरा आलेल्या २८ पॉझिटिव्ह अहवालांची भर पडली. साताऱ्यातील एकूण परिस्थिती पाहता लॉकडाऊन आणखी कडक करुन वाढवण्याची घोषणा ३१ मे पूर्वी करण्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मुंबईवरून गावाकडे आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळत असून या लोकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात यावं अशी मागणीही जोर धरत आहे.

बेलवडे येथील अर्धांगवायू आणि मधुमेह असलेला 68 वर्षीय पुरुष 19 मे रोजी मुंबईवरून आलेला होता. घरात विलगीकरणात कक्षात असतानाच तो तिथे चक्कर येऊन पडला. या अपघातातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा स्त्राव अगोदर घेण्यात आला होता. मृत्यू पश्चात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

सातारा जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी
वाई तालुका – जांभळी-1, आसले 2, वेरुळी 1, कोंढावळे – 1, किरोंडे -1, वडवली-1, वाई ग्रामीण रुग्णालय-1.
महाबळेश्वर तालुका – देवळी-2, पारुट-3, गोरोशी-1 .
जावळी तालुका – तोरणेवाडी-1, बेलवडी-1 (मृत).
खटाव तालुका – बनपूरी -1, वांझोळी-1, डांभेवाडी-2,
सातारा तालुका – वावदरे-1
कराड तालुका – शेणोली स्टेशन -7