सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी : मोहरेतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | जिल्ह्यात कोरोनाचा बुधवारी तिसरा बळी गेला असून शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ५० वर्षीय व्यक्तीची मागील तीन दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असताना दुपारी त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यामध्ये मुंबईहून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. खानापूर तालुक्यातील सुलतानगादेतील महिला, आंबेगाव येथील 36 वर्षीय तरुण, करुंगली मधील 33 वर्षीय तरुण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडीतील आठ वर्षीय मुलीचा त्यामध्ये समावेश आहे. या चौघांना मिरजेतील कोरोना रुग्णालयातील दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत ४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. सध्या मुंबई तसेच अन्य राज्यातून आलेले प्रवासी दाखल होत आहेत. बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्यामध्ये सध्या कोरोना रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिराळा तालुक्यातील मोहरे येथील 50 वर्षीय व्यक्ती मुंबईतून आली होती. त्या व्यक्तीमध्ये कोरोना लक्षणे आढळल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. त्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मिरज येथील आयसोलेशन कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु मागील तीन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड निर्माण झाला होता. ती व्यक्ती 3 दिवस ऑक्सिजनवर होती. सकाळपासून त्या व्यक्‍तीची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक त्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवून होते, मात्र दुपारी मोहरे येथील त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मोहरेतील व्यक्तीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या बळीची नोंद झाली. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे ९२ रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी तीन व्यक्तीचा मृत्यू झाला असून ४८ जण कोरोनामुक्त रुग्ण झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४१ कोरोनाचे रुग्ण आहेत. दरम्यान, सुलतानगादे, करंगुली व आंबेगाव येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे तिन्ही ठिकाणी कंटेनमेंट झोनची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाकडून गावातील नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.

Leave a Comment