सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. जिल्हा बॅंकेसाठी अंतिम मतदारांची संख्या 1 हजार 964 झाली आहे. मतदार यादी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक कार्यालय, जिल्हा बँक, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लावण्यात आली आहे.
सातारा जिल्हा बँकेसाठी गत महिन्यात मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर यादीवर हरकती घेतल्यानंतर दि. 27 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची अंतिम मुदत होती. परंतु माढा मतदारसंघाचे खा. रणजितसिंह ना. निंबाळकर व माण- खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या ठरावाबाबतचा निर्णय उच्च न्यायालयात रखडला होता. यावर निकाल लागल्यानंतर सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली.
यामध्ये पाटणमधील घोट सोसायटीचा ठराव रद्द झाला. माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील संत सावता माळी पाणी पुरवठा संस्था व गोरखनाथ पाणी पुरवठा संस्थेचे दोन मतदार वाढले. या अंतिम मतदार यादीत विकास सेवा सोसायटी 956, खरेदी विक्री संघ 11, कृषी प्रक्रिया 27, नागरी सहकारी बँका 374, गृहनिर्माण 272 व औद्योगिक मजूर पाणी पुरवठा 324 मतदार बँकेसाठी मतदान करणार आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्याने येत्या काही दिवसात निवडणूक कार्यक्रम लागू होणार आहे.