सातारा | जिल्हा वाहतूक शाखा व शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरोधात जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेमध्ये 588 जणांचा वाहन चालविण्याचा परवाना (लायन्स) निलंबित करण्यात आला आहे. तर 12 मार्च 2022 रोजी लोकअदालतीत वाहन कारवाईत तडजोड तब्बल 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्या वाहन चालकांमधील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक विकास पाडळे व शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी शहर व जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली.
जिल्हा वाहतूक शाखेचे विकास पाडळे म्हणाले, या मोहिमेमध्ये प्रामुख्याने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, दारू पिऊन वाहन चालविणे, महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न करणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या चालकांना कायद्याची जरब बसावी, यासाठी संबंधित वाहनचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याच्या प्रक्रियेवर पोलिसांकडून भर देण्यात आला. त्यानुसार या वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित करण्याबाबतचे प्रस्ताव पोलिसांकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आले. या प्रस्तावांवर कारवाई करताना उपप्रादेशिक परिवहन विभागाने 588 वाहनचालकांचे वाहन चालविण्याचे परवाने निलंबित केले आहेत.
दंडात्मक कारवाईचा बडगाही पोलिसांनी अनेकांवर उगारला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले होते. या खटल्यांची लोकअदालतीमध्ये सुनावणी झाली. त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार तब्बल 65 लाख रुपये तडजोड शुल्क भरून घेण्यात आले.