लिव्ह इन रिलेशनशीपमधून हाफ मर्डर : महिलेसह पाच युवकांवर गुन्हा दाखल

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असलेल्या युवकाला पाच जणांनी बेदम चोप दिला. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी लिव्ह इन रिलेशनशीपमधील महिलेसह पाच युवकांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अदिल कुर्लेकर, संकेत डाळवाले, अरबाज खान, महंमद मुकंदर, सूरज रजपूत (सर्व रा. शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे. योगेश इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जखमी योगेश व संबंधित महिला गेल्या 4 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वाद होण्यास सुरुवात झाली. दि. 21 रोजी वाद विकोपाला गेल्यानंतर महिलेने इतर संशयित आरोपींशी संगनमत करून योगेशला मारहाण करण्यास सांगितले. संशयितांनी त्यानुसार योगेश याला बेदम मारहाण केली व जखमी अवस्थेत संबंधित महिलेकडे योगेश याला सोडले. योगेश मारहाणीत जखमी झाल्याने संबंधित महिलेने तिच्या मैत्रिणीच्या घरी जखमी योगेश याला सोडले. दि. 21 रोजी रात्रभर तो विना उपचाराचा तेथेच होता. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत योगेश बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांकडे एमएलसी आल्यानंतर मारहाण असल्याचे समोर आले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने तपासाला सातारा तालुका पोलिसांनी सुरुवात केली. महिलेने संशयित युवकांची नावे सांगितल्याने पोनि विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकातील (डीबी) पोलिस हवालदार दादा परिहार, नितीराज थोरात, सतीश पवार यांनी बुधवारी संशयितांची धरपकड केली. तपासामध्ये मात्र या घटनेत महिलेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला सहआरोपी केले आहे.