नवी दिल्ली | लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना निवडणूक आयोगाने शनिवारी चांगलाच धक्का दिला. निवडणूक आयोगाकडून शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली मात्र साताऱ्याची लोकसभेची पोटनिवडणूक मात्र जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणीत वाढच झाली. मात्र आता निवडणूक आयोग २७ तारखेला निघणाऱ्या विधानसभेच्या अधिसूचनेसोबत साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणूकीची देखील अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्यानिवडणुकी व्यतिरिक्त अन्य पोटनिवडणुका देखील जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाला कायदेशीर अधिकार आहे. मात्र अधिसूचनेवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होण्यापूर्वी हे सर्व फेरबदल निवडणूक आयोगाने आपसात बसून करून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आचारसंहितेची घोषणा आधीच झाल्याने सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लावण्यासारखी पृष्ठभूमी आधीच निवडणूक आयोगाला उपलब्ध असल्याने निवडणूक आयोग २७ तारखेला सातारा लोकसभेची पोटनिवडणूक अधिसूचना राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवू शकते.
मागील मोदी सरकारमध्ये पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्याची स्थिती देशाने पहिली आहे. त्यामुळे साताऱ्याची लोकसभा निवडणूक जर विधानसभेसोबत झाली नाही. तर उदयनराजेंच्या विजयाचा मार्ग देखील खडतर होण्याची शक्यता आहे. म्हणूनच विधानसभे सोबत सातारची होणारी लोकसभा उदयनराजेंसाठी संजीवनी ठरणारी होऊ शकते.