सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 9 बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा बाजार समितीच्या 18 जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 61 अर्ज दाखल झाले. साताऱ्यात खासदार उदयनराजे गट विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गट अशी लढत होत आहे. दरम्यान सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अजिंक्य पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली असून मालगाव येथील भटक्या जाती प्रवर्गातून दत्तात्रय लक्ष्मण लोकरे हे बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी सातारा समितीत सोसायटी 11, ग्रामपंचायत 4, व्यापारी 2 आणि हमाल-मापाडी 1 अशा 18 जागा आहेत. या जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 61अर्ज दाखल झाले. यामध्ये सेवा संस्था गटातील अर्ज शेतकरी सर्वसाधारण 24, महिला सर्वसाधारण 5, इतर मागासवर्ग 2, विमुक्त जाती-भटक्या जमाती 3 अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारणमधून 10, अनुसूचित जाती-जमाती 4, आर्थिक दुर्बल 3 अर्ज दाखल झाले. हमाल-मापाडी मतदारसंघात 2, तर व्यापारी मतदारसंघ 8 अर्ज दाखल झाले.
सातारा शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप खासदार उदयनराजे भोसले याच्या गटाविरोधात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने आपले उमेदवार उभे केले आहेत. दोन्ही गटातील उमेदवारांमध्ये चांगली लढत होणार असल्याने सध्या साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटातील संचालक पदाचे उमेदवार दत्तात्रय लक्ष्मण लोकरे हे बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत.