सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कोरेगाव शहरात सोन्याचे दागिने घडवून देण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने 51 तोळे 8 ग्रॅम सोने व रोख रक्कम 2 लाख रुपये असा 31 लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. गोपाल सुबोध सामुई (मूळ- रा. शाम सुंदरपुर घाटाल, जिल्हा- मेदनापूर पश्चिम बंगाल. सध्या रा. कोरेगाव नगरपंचायतीसमोर कोरेगाव) असे पोबारा केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव व्यापार पेटेतील सोन्याचे व्यापारी आणि मगर ज्वेलर्सचे मालक विशाल आकाराम मगर (रा. शांतीनगर- कोरेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, गुरुवारी सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यवसाय करणाऱ्या गोपाल सुबोध सामुई याने माझ्या दुकानातून तसेच पंधरा दिवसापासून शहरातील इतर लोकांकडून सोन्याचे दागिने घडवून देतो, म्हणून 51 तोळे आठ ग्रॅम सोने आपल्या ताब्यात घेतले. त्याची बाजार भावाप्रमाणे 29 लाख 52 हजार 600 रुपये किंमत होते. तर माझ्याकडून रोख दोन लाख रुपये घेतले आहेत. त्यानंतर गोपाल याने घडवायला दिलेले सोन्याचे दागिने व माझी रोख रक्कम न देता पोबारा केलेला आहे. त्याने एकूण 31 लाख 52 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला, अशी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. बिराजदार करत आहेत.