सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
कोरोनाच्या काळातही चोरी, विनयभंग करण्याच्या घटना या घडत आहे. सातारा पंचायत समिती येथेही विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असलेल्या व गोडोली येथे राहणाऱ्या संजय श्रीरंग धुमाळ याने एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात शनिवारी रात्री सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सातारा पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी पदी कार्यरत असलेल्या संजय धुमाळ यांच्या अखत्यारीत एका शाळेत शिक्षिका कार्यरत आहे. त्या शिक्षिकेशी कामाच्या माध्यमातुन धुमाळ याने जवळीक वाढविली. तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणीही केली. त्यानंतर धुमाळ याने विनयभंगही केला आहे. काम नसतानाही आपलयाकडे वारंवार बघणे, सारखा फोन करणे, तुला कोणीही शाळेमध्ये कसल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, असे सांगणे असे विनयभंग झालेल्या शिक्षिकेने आपल्या तक्रारीत म्हंटल आहे. धुमाळ याने भरतगाव तसेच शेंद्रे या ठिकाणी असलेल्या महाविद्यालय परिसरात आपल्याला मानसिक त्रास देण्याचे काम केल्याची तक्रार संबन्धित महिला शिक्षिकेने केली आहे.
सातारा पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी पदी कार्यरत असलेल्या संजय धुमाळ याने एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्यानंतर त्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना समजली. त्यांनी त्या शिक्षिकेची तक्रार घेत सातारा पंचायत समिती येथे असलेल्या विशाखा समितीकडे पाठवून दिली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यानंतर तक्रारदार शिक्षिका महिलेने धुमाळ यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यकी पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी करीत आहेत.