सातारा | कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर आज सकाळी ९ च्या सुमारास दुचाकी व चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरून जाताना लोकांना कसरत करावी लागत आहे. शुक्रवारी सकाळी कोरेगाववरून पुसेगावला जाणारी चारचाकी गाडी, ललगुणवरुन कोरेगावकडे निघालेल्या दुचाकीला धडकली. रस्त्यावर खडी अंथरली असल्याने, दगड चुकवण्याच्या नादात असलेल्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. या दुचाकीवरील महिला धडक बसल्यानंतर चारचाकीच्या पुढील काचेवर आदळली तर गाडीवरून पडल्याने युवकाचा पाय दोन ठिकाणी मोडला. दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरेवगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.
दरम्यान या रस्त्याच्या कामाबाबत वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून काहीच हालचाली होत नसल्याने स्थानिक लोक संतप्त आहेत. या रस्त्यावर मागेही अनेक अपघात झाले असून अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.