पोक्सोचा गुन्हा : अल्पवयीन 11 वर्षीय मुलीवर 22 वर्षाच्या नातेवाईकाने केला अत्याचार

Balrampur Rape Victim
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा |अकरा वर्षाची मुलगी घरात एकटी असताना जवळच्या नातलगाने चिमुरडीवर जबरदस्तीने अत्याचार केला. सातारा जिल्ह्यात दिवसभरात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या. यामध्ये एक सातारा शहरातील अकरा वर्षीय तर खंडाळा तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात अत्याचाराबाबत पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या महिलेच्या नंणदेच्या 22 वर्षीय मुलाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. त्यांची अकरा वर्षांची मुलगी मंगळवारी घरात एकटीच होती. त्यावेळी नणंदेचा मुलगा घरात गेला. त्याने दरवाजा लावल्यानंतर चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला. तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मातेने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पथके पाठविली. मात्र, संबंधित युवक फरार झालेला होता. या प्रकारामुळे साताऱ्यासह संबंधित उपनगरात संतापाची लाट उसळली आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी योग्य पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. संबंधित युवकाविरोधात तक्रार दिली असून 22 वर्षीय युवकावर पोक्सो कायद्यांतर्गत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहर पोलिसांनी युवकाला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.