हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आज पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाका येथे अंमली पदार्थ विक्री विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत पथकाने आरएमडी पान मसाला व तंबाखू असा सुमारे 8 लाख 16 हजार रुपये किंमतीचा गुटखा व वाहन असे एकूण 13 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यात होत असलेल्या छुप्या पद्धतीच्या अंमली पदार्थ विक्री व वाहतुकीविरोधात कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या महिन्यात 13 मे पासून कारवाईच्या विशेष मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा याची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कारवाई केली जात आहे.
सोमवारी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना छुप्या पद्धतीने वाहनातून पुण्याहून सातारला वाहतूकीकरता बंदी असलेला गुटखा पानमसाला घेवून येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी सहाय्यकी पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित पथकाने आनेवाडी टोलनाका (ता. जावली, जि. सातारा) येथे सापळा रचला. त्या ठिकाणी वाहन क्रमांक (एम. एच. 12. टी. व्ही 9580) मधून दोन इसम त्याठिकाणी आले असता. त्यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी वाहनामध्ये गुटखा पानमसाला असल्याचे कबूल केले. यानंतर पथकांनी संबधितांसह वाहनाला व मुद्देमालास ताब्यात घेतले.