सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा शहरामध्ये दुचाकी चोरींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या चोरींचा तपास करत सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच एक कारवाई कारवाई केली. त्यामध्ये 2 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या बुलेट व बजाज पल्सरची चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना काल अटक केली.
किशोर हणमंत माने (वय 20, रा. तडवळे, ता. कोरेगाव, जिल्हा सातारा सध्या रा. सातारारोड) व शिवराज संतोष फाळके (वय 19, रा. पवार हाऊस सातारारोड, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरात दुचाकी चोरीचा तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या मार्फत प्राप्त झाली. त्यानंतर पथकाकडून सातारा शहरात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. त्यावेळी शहरातील अजंठा चौक परिसरामध्ये दोन युवक विना नंबरप्लेट बजाज पल्सर दुचाकीवरून संशयास्पद फिरताना त्यांना दिसून आले. त्यावेळी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना कोणतेही समाधानकारण उत्तरे देता आली नाहीत.
त्यानंतर पथकाने युवकांना ताब्यात घेवून त्यांना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. तसेच त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दुचाकीची चोरी केली असल्याची माहिती दिली. संबंधित चोरटयांनी माहिती दिल्यानंतर सदर दुचाकी या बारामती तालुक्यातून चोरी केल्याचे पोलिसांना समजले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता आणखी एक बुलेट चोरी केली असल्याचे कबूल केले. 2 लाख 30 हजार रुपये किमतीच्या दोन्ही दुचाकी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हददीतील असल्याने संबंधित पोलीस ठाणेस सदरची माहिती देण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी केलेली आहे.