सातारा | फेसबुक अकाउंट हॅक करत त्याद्वारे पैशांची मागणी करणाऱ्या हरियानातील वाहिद हुसने (वय- 23) याला सातारा पोलिसांच्या पथकाने अटक केली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा नोंद होता. राजकीय, तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करत त्याद्वारे नागरिकांकडून पैसे मागण्याच्या घटना गेल्या काही जिल्ह्यात घडत होत्या. अशीच एक घटना नुकतीच वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
याबाबतची तक्रार त्या पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करत संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी उपअधीक्षक अजित बोन्हऱ्हाडे, नीलेश देशमुख यांना केल्या होत्या. यानुसार सायबर सेलचे निरीक्षक नवनाथ घोगरे, विश्वजित घोडके यांनी कर्मचारी उपनिरीक्षक विशाल भंडारे, कर्मचारी अमित झेंडे, अजय अधिव, गणेश पवार, सचिन पवार, संदीप पाटील, अनिकेत जाधव, महेश जाधव यांच्या मदतीने तपास सुरू केला.
संशयित राजस्थान आणि हरियाना येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एका पथकाने हरियाना येथे तळ ठोकला होता. या पथकाने त्याठिकाणाहून वाहिद हुसने (वय- 23, रा. पिरथी बाथ, ता. पुन्हाना, जि. नूह, हरियाना) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडूज येथील न्यायालयाने दिले आहेत.