सातारा | रामनगर येथे रात्री उशिरा शतपावली करताना रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून काैशल बेबले या तरूणाच्या डोक्यात काेयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात 8 जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश बाळासाहेब जगताप (वय- 20, रा. वर्ये, ता. सातारा), आदर्श हणमंत रणखांबे (वय- 21, रा. मंगळापूर, ता. कोरेगाव), अनिल रत्नदीप जाधव (वय- 23, तांदूळवाडी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काैशल लक्ष्मण बेबले (वय- 26, रा. रामनगर, सातारा) हा शुक्रवारी रात्री 8.30 वाजता गावातूनच शतपावली करत निघाला होता. त्यावेळी वरील संशयित हे रस्त्याच्याकडेला बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात लावली होती. ही दुचाकी बाजूला काढ, असे काैशल बेबले याने सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. रात्री पावणेदहा वाजता वरील संशयितांनी आपले सात ते आठ मित्र आणून काैशल बेबलेवर हल्ला केला. यावेळी आदर्श रणखांबे याने काैशलच्या डोक्यात कोयता मारला. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली.
काैशलचे भाऊ व मित्र तेथे येताच संशयितांनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या काैशलला तातडीने साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकाराची सातारा तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघा संशयित आरोपींना अटक केली. त्यांचे इतर साथीदार फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे अधिक तपास करीत आहेत.