सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गत काही वर्षांत लोकसंख्या वाढल्याने राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य संख्येत वाढ होणार आहे. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेत 10 सदस्य वाढून 64 ऐवजी 74 सदस्य होणार आहेत. प्रत्येक गटात पंचायत समित्यांचे दोन गण वाढल्याने 20 पंचायत समिती सदस्य वाढणार आहेत. त्यामुळे 11 पंचायत समित्यांमधील 128 असणारी सदस्य संख्या 148 होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक गट आणि गणांची रचना तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी जि. प. गट व पंचायत समिती गणाच्या रचनेच्या प्रारूप कच्च्या आराखड्याची माहिती जिल्हाधिकार्यांकडे सादर केली होती. जिल्हाधिकार्यांनी यावर चर्चा करून याचा अहवाल सरकारला सादर केला होता.
जिल्हा परिषदेचे 10 गट वाढल्याने पंचायत समित्यांचे प्रत्येकी दोन गण वाढल्याने पंचायत समिती सदस्यांची संख्या 20 ने वाढली आहे. त्यामुळे नव्याने आता 74 गट आणि 148 पंचायत समिती गण होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या नव्या गटरचनेनुसार कराड तालुक्यात 2, फलटण तालुक्यात 2, खटाव तालुक्यात 2, कोरेगाव 1, पाटण 1, सातारा 1 व वाई तालुक्यात 1 असे मिळून 10 गट वाढण्याची शक्यता आहे. 10 सदस्य वाढल्याने गट रचनेत फार मोठा बदल होणार आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल.